वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी तहसीलदार यांची परवानगी मिळवून देण्यासाठी खासगी व्यक्ती संजय महादेव जाधव (वय-28) याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजाराची लाच मागितली. तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी सुधाकर चिद्दरवार (वय-50) याने लाचेची रक्कम स्विकरण्यास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी दोघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 28 वर्षाच्या तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या सपाटीकरणासाठी हवेली तहसीलदार यांची परवानगी पाहिजे होती. तहसीलदारांची परवानगी मिळवून देतो असे सांगून संजय जाधव याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पंचासमक्ष 26 मार्च ते 26 मे 2021 या कालावधीत पडताळणी केली.
खासगी इसम संजय जाधव याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी चिद्दरवार यांनी खासगी व्यक्ती संजय जाधव याला लाच मागण्यात प्रोत्साहित केल्याचे तपासात समोर आले.त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.