Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिककरांसाठी आता या ४ शहरांसाठी विमानसेवा नाही

aeroplane
, बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (21:48 IST)
नाशिक – नाशिककरांसाठी दिवाळीच्या तोंडावर अतिशय वाईट बातमी आहे. कारण, नाशिकपासून आता चार शहरांसाठीची विमानसेवा बंद होणार आहे. अलायन्स एअर या कंपनीने तशी घोषणा केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीच्यावतीने केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत सेवा दिली जात आहे. आणि आता ऐन दिवाळीतच ही सेवा बंद होत आहे.
 
ज्या शहरांमध्ये विमानतळ आहे पण तेथे प्रवासी विमानसेवा दिली जात नाही, अशा शहरांसाठी केंद्र सरकारने उडान ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नाशिकमधील ओझर विमानतळावरुन विमानसेवा कार्यन्वित झाली. याच योजनेच्या माध्यमातून अलायन्स एअर या एअर इंडियाच्या उपकंपनीने सेवा सुरू केली. नाशिकमधून पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांसाठी प्रारंभी सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद सेवा बंद करण्यात आली. मात्र, कंपनीने अहमदाबाद आणि पुणे ही सेवा अतिशय उत्तम पद्धतीने दिली. त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला. यानंतर कंपनीने नाशिकहून अहमदाबाद मार्गे दिल्ली आणि नाशिकहून पुणे मार्गे बेळगाव या शहरांसाठी सेवा दिली. या चारही सेवांना मोठा प्रतिसाद मिळाला. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने प्रवासी कंपनीच्या सेवांचा लाभ घेत आहेत. असे असतानाच आता केंद्र सरकारच्या उडान योजनेचा कालावधी संपत असल्याने अखेर या सेवा बंद होत आहेत. कंपनीने तसे पत्र विमानतळ प्रशासन असलेल्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ला दिले आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपासून कंपनीच्या नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-दिल्ली आणि नाशिक-पुणे-बेळगाव या सेवा बंद होणार आहेत.
 
सेवा बंद होत असल्याची माहिती मिळताच खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाशी संपर्क केला. विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उडान योजना आहे. ती कायमस्वरुपी देता येणार नाही. या योजनेद्वारे संबंधित शहरात विमानसेवा सुरू राहू शकते की नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्या व्यावसायिक पद्धतीने त्या त्या शहरात सेवा सुरू करतील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 
दरम्यान, अलायन्स एअरद्वारे दिल्या जाणाऱ्या शहरांसाठी अन्य विमान कंपन्यांनी सेवा द्यावी, असे पत्र एचएएल प्रशासनाने विमान कंपन्यांना दिले आहे. त्यास प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. तर, यासंदर्भात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी जातीने लक्ष घालून विमानसेवा कार्यन्वित करावी, अशी मागणी नाशिकच्या उद्योग, व्यवसाय, पर्यटन आणि अन्य क्षेत्रातून होत आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाचे XBB सब-वेरिएंट किती धोकादायक आहे? महाराष्ट्रात आढळले 18 प्रकरणे; एम्सचे माजी प्रमुख गुलेरिया यांचा इशारा