Publish Date: Thu, 05 Jan 2023 (08:29 IST)
Updated Date: Thu, 05 Jan 2023 (08:31 IST)
दापोली तालुक्यातील पावनळ येथे तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. सुशांत किशोर परब असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी तपास करून हा खून त्याच्या मित्राने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी मित्राला अटक केली आहे. खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, २ जानेवारी रोजी करंजाळी येथे अनिल रामाणे हे शेतीचे कवळ तोडण्यासाठी गेले असता त्यांना एका पुरुषाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. त्यांनी ही बाब पोलीस पाटील प्रकाश मोरे यांना सांगितली. मोरे यांनी याची माहिती दापोली पोलिसांना दिली. त्यानंतर हा मृतदेह सुशांत परब याचा असल्याचे निष्पन्न झाले. आकस्मिक मृत्यूची पोलिसांत नोंद केली होती. तपासा दरम्यान सुशांत त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकरवाडी येथे रहात होता. त्याचा अंधेरी (मुंबई) येथील मित्र जयकिसन ओमप्रकाश सिंग हा १ जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे त्याला भेटायला आला होता.
रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले. त्यानंतर जयकिसन याने सुशांतचा काटा काढला. त्याच्या अंगावरील सर्व कपडे झाडावर अडकवून ठेवले. त्यानंतर जयकिसन सकाळी सुशांतच्या घरी आला व त्याच्या आजीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून बाहेर पडला. दरम्यान सुशांतचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.
मोबाईल कॉलच्या लोकेशनवरून जयकिसनला खेड येथील लॉजमधून ताब्यात घेतले. जयकिसन याला अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Edited by: Ratnadeep Ranshoor