नाशिक शहरालगत असलेल्या इगतपुरीत येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने १ लाख प्लास्टिक बाटल्यांचा २१ मीटर गगनचुंबी मनोरा बनवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. आता या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लवकरच होणार आहे.यातून कंपनीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
काही दिवसापूर्वी भारत स्वच्छता अभियान अंतर्गत महिंद्राच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी नाशिक आणि परिसरात स्वच्छता मोहिम राबवली होती. त्यावेळी महिंद्राच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाला हानिकारक असलेल्या १ लाख ३०० प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेला हा प्लॅस्टिक कचरा पर्यावरणासाठी किती घातक आहे याचा संदेश नागरिकांना देण्यासाठी महिंद्रानं मनोरा बनवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्लास्टिक बंदीसाठी उत्साहाने सक्रिय सहभागी भाग घेतला. आता या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक वापराला स्वखुशीने प्रतिबंध करण्यात आलेला असल्याने ही कंपनी प्लॅस्टिकमुक्त कंपनी ठरली आहे.