- लोअर परळच्या गणेशभक्ताची अनोखी भक्ती
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी भक्त कोणतीच कसर सोडत नाहीत. लोअर परळ येथील श्रीओम लोकरे यांपैकीच एक गणेशभक्त. त्यांचा गणपती ‘श्रींचा राजा’ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी बाप्पाचरणी वेगवेगळी सेवा वाहणार्या श्रीओम यांनी यंदा बाप्पासाठी खास गाणे तयार केले आहे. ‘ओम ईश गणाधिश स्वामी...’ असे या गाण्याचे बोल असून लवकरच या गाण्याच्या व्हिडीओ यू-ट्यूबवर लॉन्च होणार आहे.
श्रीओम यांचे वडील गुरूवर्य श्री हरिओमजी विजयानंद स्वामी हे श्री स्वामी समर्थांचे सच्चे भक्त. वडीलांच्या प्रेरणेतून आणि श्री स्वामी समर्थ अध्यात्म परिवाराच्या सहकार्याने लोकरे यांच्या लोअर परळच्या त्रिशूळ इमारतीतील घरी २००९ सालापासून दहा दिवसांसाठी लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली फायबरची मूर्ती बसविण्यात येते. विशेष म्हणजे या मूर्तीचे विसर्जन होत नाही. ही मूर्ती फक्त दर्शनीय असून पंचधातूंनी बनलेल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. लोकरे यांच्या घरी यंदा सजावटीसाठी फायबरचाच गडगरूड महल बनविण्यात आला आहे. हा महल बडोदा येथून आणल्याचे श्रीओम यांनी सांगितले.
बाप्पासाठी आरती संग्रहही
‘ओम ईश गणाधिश स्वामी...’ हे गाणे गायिका नेहा राजपाल यांनी गायले असून या गाण्याला अशोक वायंगणकर यांनी संगीत दिले आहे. तसेच समीरा गुजर हिच्या अभिनयाने हे गाणे सादर झाले आहे. पराग सावंत यांनी या व्हिडीओचे संकलन केले असून लवकरच हा व्हिडीओ यू-ट्यूबवर प्रसिद्ध होणार आहे. तसेच यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांना श्री स्वामी समर्थ अध्यात्म परिवाराच्यावतीने आरती संग्रही भेट देणार असल्याचे श्रीओम यांनी सांगितले.
बाप्पाच्या दर्शनासाठी सेलिब्रेटींची मांदियाळी
लोकरे कुटुंब हे स्वामी भक्त. त्यांच्या घरात श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यामुळे स्वामींचे भक्त असलेले अनेकजण गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठीही येतात. मराठी सेलिब्रेटींची तर लोकरेंच्या घरात मांदियाळीच असते. रझा मुराद, मार्वंâड अधिकारी, गौतम अधिकारी, मकरंद अनासपुरे, नितीन देसाई, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, कमलेश सावंत, अभय राणे, संग्राम साळवी, अच्युत पालव आदी सेलिब्रेटी लोकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अवश्य येतात.
पोलिसांच्याहस्ते यंदा ‘श्रीं’ची महाआरती
दरवर्षी दहा दिवस सेलिब्रेटींच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात येते. यंदा श्रीओम यांनी आरतीचा मान पोलिसांनादेखील दिला आहे. २८ ऑगस्टच्यादिवशी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी लोकरे यांच्या घरी जाऊन आरती करणार आहेत.
पूजेत सोवळ्याचा मान, ५१ दिव्यांची आरती आणि १००८ वातींचा होम
दहा दिवस सोवळे नसून पूजा करणार लोकरे कुटंबिय एकमेव असतील शिवाय आरती सुरू होण्यापूर्वी ६ शंखांचा नाद, नगार्याचे वादन आणि घंटानाद केला जातो. तसेच आरतीत ५१ दिव्यांना मान दिला जातो. त्याचबरोबर पंचाआरती, सप्ताआरती, अकरा आरती बाप्पासमोर ओवाळली जाते.