ठाणे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आग्रा महामार्ग हा अत्यंत धोकादायक बनला आहे. प्रचंड खड्डे आणि अपघाताबरोबरच आता चोरट्यांनीही या महामार्गावर बस्तान बसवले आहे. त्यामुळेच नाशिक ते भिवंडी फाटा यादरम्यान लुटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यातून वाहनचालक आणि प्रवासी यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता पोलिसांकडूनच जनजागृती करण्यात येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. विशेषतः नाशिक ते ठाणे या पट्ट्यात वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणावर असते. परंतु गेल्या चार महिन्यांपासून जोरदार पावसामुळे हा रस्ता अत्यंत खड्डेमय बनला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग अतिशय मंदावतो. त्याचा फायदा घेऊन तसेच रात्री अंधाराच्या ठिकाणी लूटमार करणारी टोळी सक्रीय झाली आहे.
असा सुरू आहे प्रकार
तू मला कट का मारलास, असे सांगून चोरटे वाहन थांबवायला भाग पाडतात. या चोरट्यांची कार असते. त्यांच्या कारमध्ये काही पुरुष आणि स्त्रीया असतात. वाहन थांबविताच ते संबंधितांशी वाद घालतात आणि चाकूचा धाक दाखवून दाखवून दागिने, पैसे आणि मोबाईलसह अन्य किंमती सामानाची लूट करतात. तर काही वेळा गोड बोलून संवाद साधत वाहनांमधील मौल्यवान वास्तू लंपास करतात. विशेषतः रात्रीच्या वेळी इगतपुरी पासून ते कसारा घाटापर्यंत आणि कसारा गावापासून ते पडघापर्यंत गेल्या चार महिन्यात लुटमारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या टोळीतले व्यक्ती हे आरोपी वाटत नाही. त्यात काही पुरूष आणि महिलांचा समावेश आहे.
अनेकांच्या तक्रारी
लूटमार प्रकरणी ट्रक, कार, खासगी बस आणि अन्य वाहनांमधील चालक आणि प्रवाशी यांनी काही ठिकाणी असलेल्या पोलीस चौकांमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्यापही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. नाशिक ते ठाणे दरम्यान असलेल्या या महामार्गावर नाशिक ग्रामीण, इगतपुरी तालुका, कसारा, शहापूर, कल्याण आणि भिवंडी अंतर्गत काही पोलीस ठाणे काही ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. परंतु त्या रात्रीच्या वेळी बंद असल्याने चोरट्यांचे फावते आहे. मात्र, पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांचे आवाहन
वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविले आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती रस्त्यावर असल्यास गाडी थांबवू नका किंवा कुणीही वाहन थांबविण्याची विनंती केली तरी थांबवू नका, वाहन थांबविले तरी वाहनाच्या खिडक्यांच्या काचा उघडू नका, तातडीने पोलिसांशी संपर्क साधा, असे पोलिसांनी सांगितले आहे. असे काही घडल्यास तातडीने पोलीस कंट्रोल विभागाला किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. किंवा पोलिसांच्या १०० किंवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.