Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन तासात लग्न उरका; अन्यथा 50 हजार रुपये दंड, ‘या’ वेळेत सुरु राहणार किराणा, बेकरीची दुकाने

दोन तासात लग्न उरका; अन्यथा 50 हजार रुपये दंड, ‘या’ वेळेत सुरु राहणार किराणा, बेकरीची दुकाने
, शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (09:12 IST)
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधित वगळता सर्व शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. लग्न समारंभ 25 लोकांच्या उपस्थितीत केवळ दोन तासांच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास वधू वर पक्षावर 50 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हॉल, मंगल कार्यालयाकडून उल्लंघन झाल्यास कोरोना संपेपर्यंत आस्थापना बंद करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.
 
खासगी बस वगळता इतर खासगी प्रवासी वाहतूक आपत्कालीन व अत्यावश्यक कारणासाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. अंतर-जिल्हा किंवा शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यास वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग, अंत्यसंस्कार, कुटुंबातील व्यक्तींना गंभीर स्वरूपाचे आजार ही कारणे असल्यासच प्रवासाला परवानगी राहील. या नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
 
खासगी बस आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. उभे राहून प्रवास करता येणार नाही. खासगी बस एका शहरात फक्त दोन थांब्यावर थांबवता येईल. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर 14 दिवस होम आयसोलेशेनचा शिक्का मारणे बंधनकारक आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याकरिता मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांची नियुक्ती करावी. त्याचा खर्च संबंधित आस्थापना, प्रवाशी यांनी करावा. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना ओळखपत्र असल्यास रेल्वेने प्रवास करता येईल. सर्व वैद्यकीय सेवा पुरविणारे, उपचाराची आवश्यकता असणारी व्यक्ती, त्यांच्या मदतनीस यांना तिकीट, पास देण्यात यावा, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
 
पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात रेल्वे, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापन विभागास द्यावी. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करावी. तसेच 14 दिवस होम आयसोलेशेनचा शिक्का मारावा. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णाला कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयात स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
 
दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील !
दरम्यान, कंपन्या, कारखाने पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. 20 एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व प्रकारची किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, चिकण, मटण, मासे आणि अंडी विक्री करणारी दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थासाठी साहित्याची निर्मिती करणारे दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेतच सुरू राहतील. या आस्थापनामार्फत घरपोच पार्सल सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरू राहील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाळेबंदीच्या भीतीमुळे हजारो मजुरांचे स्थलांतर