Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘किकवीचा प्रश्न मार्गी लावणार’- ना.गिरिष महाजन

‘किकवीचा प्रश्न मार्गी लावणार’- ना.गिरिष महाजन
नाशिक , बुधवार, 11 जानेवारी 2017 (14:54 IST)
उद्धव निमसेंसह विविध पक्षांतील आजी-माजी नगरसेवक,मान्यवरांचा भाजपात प्रवेश.
 
नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी किकवी धरणाच्या प्रश्नात लक्ष घालणार आणि येत्या तीन वर्षात राज्यातील कॅनॉल आणि धरणांची कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांनी दिले.
 
औरंगाबादरोडवरील वरद लाँन्स येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह विविध पक्षातील नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांनी  भाजपात प्रवेश केला त्यावेळी त्यांचे स्वागत करतांना ना.महाजन बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.बाळासाहेब सानप,आ.देवयानी फरांदे,आ.सीमा हिरे,आ.राहुल आहेर,प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते,सुनील बागुल,सुरेशबाबा पाटील,विजय साने आदी होते.
 
किकवी धरण ही काळाची गरज आहे आणि तो प्रश्न मार्गी न लावल्यास भविष्यात नाशिककारांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल अशी भीती आ.बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली असता त्याला उत्तर देताना ना.महाजन बोलत होते.नाशिक जिल्हयात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जातो.तसेच जिल्ह्यात फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यासाठी पाणी लागते याची आपणास जाणीव आहे असेही ना.महाजन यांनी पुढे नमूद केले.
 
गेल्यावर्षी पाणी खाली सोडण्याची वेळ आली तेव्हा अनेक राजकीय मंडळींनी  ऊर बडवून घेतले.कोर्टाचे निर्णय बंधनकारक असतात.त्या स्थितीतही सिंचनासाठी आपण आवर्तन सोडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.परंतु यावर्षी निसर्गाचा चमत्कार बघा ! जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत.विहिरींची पातळीही वाढली आहे,असेही ना महाजन यांनी निदर्शनास आणले.
 
नाशिकचा कायापालट करायचा असेल आणि शहराला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर महापालिकेवर भाजपाची सत्ता असणे गरजेचे आहे.नाशकात आज मनसेची स्थिती वाईट आहे.राष्ट्रवादीलाही खिंडार पडले आहे.काँग्रेस तर औषधालाही शिल्लक नाही.हे पक्ष महापालिका निवडणुकीत दोनआकडी संख्या गाठतील की नाही याबाबत शंका आहे, असा टोलाही ना.महाजन यांनी लगावला.नाशिकच्या विकास आराखड्याबाबत अनेक अफवा पसरविण्यात आल्या.परंतु मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावला.त्याने नाशिककरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे,असेही ते म्हणाले.
 
केंद्रात आणि राज्यात भाजपाची घोडदौड सुरु आहे.राज्यात भाजप अव्वल आहे हे आता सर्वानीच मान्य केले आहे.नाशिक महापालिकेत भाजपचे १७ नगरसेवक होते.परंतु विविध पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या प्रवेशामुळे भाजप नगरसेवकांची संख्या आता ४४ वर पोहोचली आहे.तीन दिवसांनी आणखी काही नगरसेवकांचा प्रवेश सोहळा आहे.त्यामुळे ही संख्या आणखी वाढेल.आपणास नव्या आणि जुन्यांचा समतोल साधून काम करायचे आहे.आगामी महापालिका निवडणुकीत ८० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची रणनिती आखावी लागेल.

नाशिकचा कुंभमेळा हरित आणि सुरक्षित झाला.महाआरोग्य शिबिरालाही रेकॉर्डब्रेक प्रतिसाद लाभला.राजकरणाबरोबरच समाजकारणावरही भाजपाचा भर असतो असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
 
आ.बाळासाहेब सानप यांनी आपल्या भाषणात भाजपात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि पक्षात त्यांचा मान राखला जाईल असे सांगितले.नाशिकचा विकास आराखडा मंजूर झाल्याने नाशिककरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.कुंभमेळ्यासाठी आम्ही निधी मंजूर करून घेयल्यानेच नाशिकचा विकास झाला असे सांगताना या प्रश्नाचे नाहक श्रेय लाटणाऱ्यांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.आ.देवयानी फरांदे,विजय साने यांचीही यावेळी भाषणे झाली.प्रवेश कारणाऱ्यांच्यावतीने उद्धव निमसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.भाजप सरकारने शिवस्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय आणि या पक्षाने विकास कामांचा लावलेला धडक लक्षात घेऊन आपण या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.निमसे यांच्याबरोबरच मनसेचे नगरसेवक रुची कुंभारकर, राष्ट्रवादीचे सचिन महाजन,संजय पाटील,माजी नगरसेवक संजय खेताडे,नानासाहेब पाटील,सिद्धेश मंडाले,मधुकर मते अनिता लभडे,शितल माळोदे, गणेश माळोदे,संदिप काळे, सिताराम लभडे,अशोक अपसुंदे, संतोष चव्हाण,बाळासाहेब राऊत आदींसह विविध पक्षांच्याअनेक  आजी माजी मान्यवरांनी भाजपात प्रवेश केला.
 
प्रास्ताविक संभाजी मोरूस्कर यांनी केले. यावेळी प्रशांत जाधव, सुरेश पाटील, पवन भगुरकर, काशिनाथ शिलेदार,शैलेश जुन्नरे, प्रशांत आव्हाड, दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे,प्रताप मेहरोलिया, प्रा.परषराम वाघेरे, अरुण पवार, दिगंबर धुमाळ, कमलेश बोडके, अजिंक्य साने, अमित घुगे, सुनिल देसाई, रंजना भानसी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजपाचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिथे शौचालय नाही तिथे मुलगी देणार नाही