दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी आज पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़.
कैलास चंदू रायघोळ (45, रा़.आम्रपालीनगर, कॅनॉलरोड, नाशिकरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 29 एप्रिल 2016 रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिकरोडच्या आम्रपालीनगरमध्ये ही घटना घडली होती़.
या परिसरात राहणार्या एका दहा वर्षीय मुलीसोबत कैलास रायघोळ याने अतिप्रसंग केला होता़. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. मोरे यांच्या न्यायलयात हा खटला सुरू होता़. यामध्ये मुलीची, डॉक्टरांची व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली़. तर महिला पोलीस उपनिरीक्षक पी. बी़. केदार यांनी या गुन्ह्याचा तपास केला़.
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यानुसार आरोपी कैलास रायघोळ यास अत्याचाराच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास तर पोस्को कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या साध्या कारावास. अशी शिक्षा सुनावली़ सरकारी वकील दीपशिखा भिडे-भांड यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासले़.