कोरोना काळात बंद असलेली गोदावरी एक्सप्रेस अखेर ११ एप्रिलपासून सुरू होणार असून जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, लासलगाव, मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळात रेल्वे प्रवासी सरकारी तसेच निमसरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली गैरसोय विचारात घेता प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार गोदावरी एक्सप्रेस 11 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.लॉकडाऊनच्या काळात बंद रेल्वे सेवा पूर्वपदावर येत असताना तोट्यात चालणाऱ्या गाड्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी ,शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाची गोदावरी एक्सप्रेस गाडी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी महसूल देत असल्याने ती बंद करण्यात आली.
गोदावरी एक्सप्रेस वर अवलंबून असणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. त्यामुळे सेवा परत चालू करावी, यासाठी संघटनांनी डॉ.भारती पवार यांना साकडे घातले होते. ११ एप्रिल ला सकाळी ११ वाजता गोदावरी एक्सप्रेस ला डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.