Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता 'या' महिन्यात होणार जमा

pm-kisan-samman-nidhi
, रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (11:21 IST)
देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते. दोन हजारांचे तीन हप्ते लाभार्थी, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. शेतकरी या योजनेच्या 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी आनंदवार्ता आली आहे.
 
कधी जमा होणार हा हप्ता?
ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. सरकार या योजनेची रक्कम मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.
 
शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. कागदपत्रांची पूर्तता न केल्याने हप्ता थांबविण्यात आला आहे. आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय यासाठी खास मोहिम राबविणार आहे. 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी अभियान राबविण्यात येईल. या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल. देशभरातील 4 लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
 
या कालावधीत मिळतो हप्ता
केंद्र सरकार दरवर्षी एप्रिल-जुलैमध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चमध्ये जारी करते. 2023-24 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना योजनेचे दोन हप्ते मिळाले. 15 व्या हप्त्यात सरकारने 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2.81 कोटी रुपये वर्ग केले आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल