हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिलेला शब्द पाळला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल असा शब्द दिला. हा शब्द पाळत सरकारने पीडितेच्या उपचारासाठी 5 लाख 43 हजार 441 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला दिले. पीडितेच्या उपचारासाठी सुरुवातीला कुटुंबीयांकडून 60 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हा खर्च देखील पीडितेच्या कुटुंबीयांना परत करण्यात आला. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळत 60 हजार रुपयांचा धनादेश पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख सदस्य सचिव डॉ. कमलेश सोणपूरे यांनी हिंगणघाट येथे जाऊन हिंगणघाटच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी हा धनादेश कुटुंबीयांकडे सोपवला.
दरम्यान, पीडितेच्या उपचाराचा रुग्णालयाकडून 11 लाख 90 हजार रुपयांचा अंदाजित खर्च शासनाला देण्यात आला होता. यानुसार सुरुवातीलाच राज्य शासनाने 4 लाख रुपये आणि नंतर 1 लाख 43 हजार 441 रुपये मंजूर केले. अशाप्रकारे मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णालयाला एकून 5 लाख 43 हजार 441 रुपये देण्यात आले. मात्र, पीडितेचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.