Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जलजीवन मिशनच्या 373 कोटी 10 लाख रुपयांच्या आराखड्यास पालकमंत्र्यांची मंजुरी

जलजीवन मिशनच्या 373 कोटी 10 लाख रुपयांच्या आराखड्यास पालकमंत्र्यांची मंजुरी
, मंगळवार, 9 मार्च 2021 (22:23 IST)
उस्मानाबाद,दि. 09 (जिमाका) : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 2020-21 च्या जिल्हास्तरीय 373 कोटी 10 लाख 49 हजार रुपयांच्या आराखड्यास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज मान्यता दिली. या आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत आणि शुध्द पिण्याचे पाणी  उपलब्ध करुन द्यावे. संबंधित विभागाने व्यक्तीश: लक्ष घालून ही कामे करावीत, असे आदेशही त्यांनी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज दिले.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 2020-21 च्या जिल्हास्तरीय आराखड्यास काल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली होती. या संबंधिच्या समितीचे अध्यक्ष या नात्याने हा आराखडा पालकमंत्री श्री. गडाख यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे आज ठेवण्यात आला. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे, आमदार ज्ञानराज चौगुले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात, जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, उपअभियंता पाटील आदी उपस्थित होते.
 टँकरने नेहमी पाणीपुरवठा करावा लागतो अशा गावांना प्राधान्य द्या. वाड्या-वस्त्या आणि तांड्यावर पिण्याच्या पाण्याचे शाश्वत स्त्रोत तयार करा, जुन्या योजनांना कार्यान्वित करा, जिल्ह्यातील शंभर टक्के गावांतील प्रत्येक ग्रामस्थास 55 लिटर पाणी मिळण्याची शाश्वती निर्माण करा असेही आदेश पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी बैठकीत दिले.
 जिल्ह्यातील 993 गावे, वाड्या-वस्त्यापैकी ‘अ’ वर्गाची 255 गावे असून या गावात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नळ जोडणी देणे, पंपाची क्षमता वाढविणे आणि गरज असेल तिथे पाईपलाईन टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत. ‘ब’ वर्गवारीत जिल्ह्यातील 294 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रत्यक्ष ग्रामस्थास 40 ते 55 लिटर पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, अतिरिक्त पाण्याची टाकी उभारणे, पाईप लाईन टाकणे आदी कामे करण्यात येतील. नवीन प्रस्तावित योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 139 गावांचा समावेश केला आहे. तर जिल्ह्यात योजना नसलेल्या गावांची संख्या 32 आहे. नवीन प्रस्तावित योजनेअंतर्गत पाणी वितरणाची व्यवस्था, पाण्याची टाकी आदी नवीन कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी अंदाजित रक्कम 81 कोटी 76 लाख 48 हजार अशी प्रस्तावित केली आहे, यास आज मंजुरी देण्यात आली आहे.
‘अ’ वर्गवारीतील 255 गावातील पाणी पुरवठ्यासंबंधित कामांसाठी 101 कोटी 19 लाख रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित केला आहे. ‘ब’ वर्गावारीतील 294 गावांसाठी 157 कोटी 84 लाख 73 हजार रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित केला आहे. योजना नसलेल्या जिल्ह्यातील 32 गावांसाठी अंदाजित 13 कोटी 19 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 450 गावे, वाड्या-वस्त्यांपैकी 273 मध्ये सोलार पंप बसविण्याचे प्रस्तावित आहे. 273 व्यतिरिक्त गावे, वाड्या-वस्त्यांचा नजीकच्या गावाच्या पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात येणार आहे. सोलार पंप योजनेसाठी 19 कोटी 11 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. या संपूर्ण योजनेचा आराखडा 373 कोटी 10 लाख 49 हजार रुपयांचा आहे. गतवर्षात जिल्ह्यात नळजोडीचे काम उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे एकूण 113.64 टक्के झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे लग्नसमारंभांना बंदी जाणून घ्या कुठे घालण्यात आली ही बंदी