उद्धव ठाकरेंनी त्यांचे गुंड आमच्या घरी पाठवले आहेत. माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. दुपारी राणा यांनी आपली मोहीम मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी त्यांना खार पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यांना अटक करण्यात आलं. या दोघांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 135 अ, 34, r/w 37(1)135 नुसार कारवाई करण्यात आली. उद्या त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई झाल्यावर त्या दोघांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आम्ही फक्त हनुमानचालिसा म्हणायला आलेलो होतो, मात्र आमच्या जीविताला धोका पोहोचेल अशी कृती करण्यात आल्यामुळे या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं राणा दाम्पत्याने म्हटलं आहे. आम्हाला मारहाण केल्यावर रुग्णालय़ात नेण्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोक घरासमोर जमले होते.आपल्या जिविताला काही झालं तर हे तिघे जबाबदार असतील असंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.