शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यावरून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
गुलाबराव पाटील बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती विसरले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गुलाबरराव पाटील यांनी आपलं वक्तव्य मागे घेऊन तात्काळ माफी मागावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. त्यांनी तसे न केल्यास आमच्या स्टाईलने निषेध नोंदवू असा इशाराही त्यांनी दिला.
या वक्तव्याबाबत गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड याठिकाणी एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत बोललो होते. चांगले रस्ते असावेत ही अपेक्षा होती. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. हेमा मालिनी यांच्याविषयी मनात आदर आहे."
गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनेही केली आहे. भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. गृहमंत्रा दिलिप वळसे पाटील यांनी याची दखल घ्यावी असंही त्या म्हणाल्या आहेत.