Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाहनाच्या अनपेड चलनाचा भरणा केला का?.. अन्यथा या तारखेला कोर्टात हजर व्हा !

वाहनाच्या अनपेड चलनाचा भरणा केला का?.. अन्यथा या तारखेला कोर्टात हजर व्हा !
, गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (08:32 IST)
नाशिकमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त चालकांवर शहर वाहतूक शाखेतर्फे ई-चलनमार्फत कारवाई केली जात आहे. मात्र, चालक हा दंड भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील कारवाईनुसार २२ हजार ५०७ चालकांनी अद्याप हा दंड भरलेला नाही. त्यामुळे या चालकांनी ‘एसएमएस’व्दारे २१ ते २४ सप्टेंबर अखेरपर्यंत दंड भरावा. दंड न भरणार्‍यांना शनिवारी (दि.२५) जिल्हा न्यायालयात होणार्‍या लोक अदालतीत हजर रहावे लागणार असल्याचे शहर वाहतूक शाखेने सांगितले.
 
नाशिक शहरातील वाहतूकीस शिस्त लागावी ,यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाते. अनेक ठिकाणी जागेवरच दंड वसूल केला जातो तर काही प्रकरणांमध्ये ई-चलनमार्फत दंड केला जातो. त्यात वाहनचालक ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक कार्यालयात हजर राहून दंड भरणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात, ई-चलनकडे वाहनचालक दुर्लक्ष करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
 
त्यामुळे प्रलंबित दंडाची रक्कम कोट्यवधींच्या घरात पोहचली आहे. थकीत वसुली करण्यासाठी शहर वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यास अपेक्षित यश मिळत नाही. वारंवार जनजागृती करूनही दंड भरला जात नसल्याने पोलिसांनी आता थकबाकी असणार्‍या चालकांना न्यायालयात येण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारपर्यंत (दि.२४) दंड न भरल्यास चालकांना शनिवारी (दि.२५) जिल्हा न्यायालयात होणार्‍या लोक अदालतीत हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. जे चालक दंड भरणार नाहीत, त्यांना न्यायालयीन प्रक्रियेस सामोरे जावे लागेल, असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
 
वाहनचालकांनी त्यांची थकबाकी महा ट्रॅफिक प किंवा पेटीएमचा वापर करून mahatraffic.echallan.gov.in या संकेतस्थळावर तसेच डेबिट-क्रेडीट कार्डमार्फत जाऊन भरणा करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड यांनी केले आहे. शहरातील चारही युनीटमध्ये प्रत्यक्ष हजर राहून वाहन चालकांना दंड भरता येणार आहे. शहर वाहतूक शाखा युनीटनिहाय कार्यालये पुढीलप्रमाणे – युनीट एक कार्यालय, स्वामीनारायण चौक, पंचवटी, युनीट दोन कार्यालय जुने पोलीस आयुक्तालय कार्यालय, एचडीएफसी हाऊससमोर, शरणपूर रोड, नाशिक, युनीट तीन कार्यालय पाथर्डी फाटा चौक, मुंबई-आग्रा हायवे सिडको, युनीट चार कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिकरोड.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात 3,608 नवे कोरोना रुग्ण, 4,285 जणांना डिस्चार्ज