उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला. अहमद भावांच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स(एसटीएफ) पथकाने नाशिक मध्ये येत चौकशीसाठी एका संशय त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला संशयित गुड्डू मुस्लिम आहे की त्याचा साथी यावर माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली.
दरम्यान प्रकरणात अतिक अहमदचा साथी गुड्डू मुस्लिम हा नाशिकमध्ये असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे या हत्येचं नाशिक कनेक्शन आल्याची चर्चा रंगली. याच प्रकरणी पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांचे एसटीएफ पथक शनिवारी नाशिक मध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या व्यक्तीचे नाव शिवबाबा दिवाकर..
शिव दिवाकर नाशिक मधील अंबड एमआयडीसी परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला आहे. दिवाकर सांगतात त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात कॉल आला, कॉल उचलतात समोरील व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व पुन्हा या नंबरवर फोन करू नको अशी धमकी देखील दिली.
हा फोन झाल्याच्या काही तासात दिल्लीहून पोलिसांचे एसटीएफ पथक नाशिकमध्ये दाखल झाले व दिवाकर ज्या हॉटेलमध्ये काम करतात तेथे पोहोचले. यावेळी हॉटेल चालकाने स्थानिक पोलिसांना देखील याविषयी माहिती दिली. एसटीएफ पथकाने दिवाकर यांना चौकशीसाठी अंबड पोलीस स्टेशन येथे आणले. त्यांना आलेला फोन कुठून कोणाचा होता, त्यांचा या घटनेशी काही संबंध आहे का याविषयी सखोल विचारणा केली. तब्बल दोन ते तीन तासांच्या चौकशीनंतर दिवाकर यांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडून देण्यात आले. यानंतर दिल्ली एसटीएफ पथक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
दिल्ली पोलिसांचे एसटीएफ पथक नाशिकमध्ये येऊन चौकशी करून गेले. ते आर्म ॲक्टच्या चौकशीसाठी नाशिकमध्ये आले होते. जाताना त्यांनी गुड्डू मुस्लिम किंवा अन्य कोणालाही सोबत नेले नाहीये." अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस स्टेशन सूरज बिजली यांनी दिली आहे.
Edited By -Ratnadeep Ranshoor