Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांना आली वेगवेगळ्या जिल्ह्यांतली केंद्र

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांना आली वेगवेगळ्या जिल्ह्यांतली केंद्र
, शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (21:18 IST)
24 आणि 31 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या क आणि ड गटाच्या पदांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्र आल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झालाय.
 
सोशल मीडियावरून अनेक परीक्षार्थींनी आपली अडचण मांडली आहे. #आरोग्यभरती_की_भोंगळभरती असा हॅशटॅग ट्विटरवर वापरला जातोय.
 
काही विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या पेपरसाठी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतलं परीक्षा केंद्र मिळालेलं आहे. तर काहींना त्यांनी प्राधान्य दिलेल्या ठिकाणापासून दूर असणारं केंद्र मिळालंय.
 
यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात हीच परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता.
फॉर्म भरताना आपण नागपूर केंद्र निवडलं होतं, पण असं असून सकाळच्या सत्रासाठी ठाणे आणि दुपारच्या सत्रासाठी वाशिम परीक्षा केंद्र हॉलतिकीटवर असल्याचं ट्वीट नितेश दादमल यांनी केलंय.
24 आणि 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या गट क आणि डची परीक्षा होणार आहे. पण यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज भरल्याने त्यांना वेगवेगळी परीक्षा केंद्र आलेली आहे.
 
यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी आपलं परीक्षाकेंद्र आणि पिनकोड जुळत नसल्याचंही म्हटलंय.
दोन वेगवेगळ्या संवर्गासाठीच्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा एक पेपर बुडण्याची भीती आहे.
 
अनेकांनी वैतागून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना टोमणे मारणारी ट्वीट्स केली आहेत.
यापूर्वी महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी नियोजित परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
 
25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज परीक्षार्थींना 24 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मिळाले होते. आता पुन्हा एकदा या परीक्षेबद्दल गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
 
परीक्षेतल्या या गोंधळाबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करणारं ट्वीट केलंय.
 
"मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय. मुख्यमंत्री साहेब राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा," असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
सरकार वा आरोग्य विभागाकडून अद्याप या भरती परीक्षांबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. क संवर्गातली 2739 आणि ड संवर्गातील 3466 पदांसाठी या परीक्षा होणार आहेत.
 
राज्यातल्या 1500 केंद्रांवर या परीक्षा एकाचवेळी होणार असून रविवार असल्याने या दोन्ही दिवशी शाळा उपलब्ध असल्याने 24 आणि 31 ऑक्टोबरची निवड करण्यात आल्याचं नवीन तारखा जाहीर करताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी आंदोलन : सिंघू बॉर्डरवर मिळालेल्या लोंबकळत्या मृतदेह प्रकरणी दोघांना अटक