बुधवारी राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. राजस्थान, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच आज बिहार, झारखंड आणि ओडिशामध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा-चंदीगड, उत्तर प्रदेशमध्ये तुरळक पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाने बुधवारी दिल्लीत पावसाचा इशारा दिला आहे.तर बुधवारी ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी ऑगस्टमध्ये दिल्लीत 23 दिवस पाऊस पडला आणि गेल्या 14 वर्षांत या महिन्यात सर्वाधिक पावसाचे दिवस होते.
तसेच गुजरातच्या विविध भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य राबवून, 15,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि 300 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि अनेक भागात पूर आला. सततच्या पावसामुळे धरण आणि नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ पाहता 15हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik