Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गृहमंत्री अमित शहा यांचा नाशिक दौरा रद्द झाला

गृहमंत्री अमित शहा यांचा नाशिक दौरा रद्द झाला
, सोमवार, 20 जून 2022 (15:01 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी दि. २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्राच्या वतीने देशभरातील ७५ धार्मिक, पौराणिक ठिकाणी योगदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे कर्नाटकातील म्हैसूर येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे योगदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्यानिमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नाशिक जिल्हा दौरा रद्द झाला आहे. त्याचे कारण आता समोर आले आहे.
 
अमित शहा यांच्या ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे आता नाशिक जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून त्रंबकेश्वर येथील मंदिर परिसरात आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात येत होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्र्यंबकेश्वर दौरा ऐनवेळी रद्द झाला असून रविवारी सायंकाळपर्यंत शाह यांच्या दौऱ्याविषयीची अनिश्चिता होती. अखेर दौरा रद्द झाल्याची माहिती आली.
 
केंद्र सरकारने देशभरातील तरुणांना देशाच्या संरक्षण सेवेत सामावून घेण्यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. परंतु या योजनेला देशभरातून अनेक ठिकाणी प्रचंड विरोध होत आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहारमध्ये धोरणांच्या याविरोधात तरुणांचा उद्रेक दिसत असून रेल्वे गाड्या जाळणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे रस्ता रोको करण्यात आला, तर डोंबिवली मध्ये देखील निदर्शने करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान असा काही गैरप्रकार घडू नये म्हणून हा दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
 
सध्या देशातील अनेक भागात ‘अग्निपथ’ योजनेवरून तरुणांकडून रोष व्यक्त केला जात आहे. अनेक राज्ये संवेदनशील बनली आहेत. या पार्श्वभूमीवर शाह नाशिक दौऱ्यावर येणार की नाही याविषयीचा प्रश्न निर्माण झाला होता. रविवारी दुपारपासून याबाबतची चर्चा सुरू असताना जिल्हा आणि पोलीस प्रशासनही संभ्रमात होते. देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अनेक राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच, तेथील इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. देशात अशा प्रकारचे वातावरण असताना गृहमंत्री शहा हे राजधानी दिल्ली सोडून बाहेर कुठेही जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शाह यांचा दौरा रद्द झाला असला तरी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत नियोजित कार्यक्रम होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

VIDEO ऋतुराजकडून ग्राऊंड्समनचा अपमान