नाशिक पोलिस अधिकाऱ्याला हनी ट्रॅप लावत ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात नगर येथील एका महिलेच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. नाशिक येथे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. घरी असताना संशयित महिलेने अनोळखी मोबाइल नंबरवरून पत्नीला फोन करून पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच नोकरी कशी करतो अशी धमकी दिली.
पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीने पैसे देण्यास नकार दिला असता संशयित महिलेने या अधिकाऱ्याचे फोटो मोर्फिग करून सोशल मीडियावर व्हायरल केले, अशी तक्रार या अधिकाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात दिली. या अधिकाऱ्याच्या विरोधात नगर जिल्ह्यात या महिलेने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नगर जिल्ह्यातील हनी ट्रॅपचे जाळे नाशिकपर्यंत पसरले असल्याचे या प्रकरणातून उघडकीस आले आहे. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दानिश मन्सुरी करत आहे.