फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जर मी एका हॉटेलमध्ये झालेल्या भेटीचे फुटेज बाहेर काढले असते तर भाजपचे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे राहिले नसते, असा प्रखर हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला.
फोर सिझन हॉटेलमध्ये महागड्या पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. एका टेबलचे बुकिंग १५ लाखांपर्यंत असायचे. या महागड्या पार्ट्यांचा आयोजक कोण होता? याची माहिती तुम्हाला नव्हती का? आपले सरकार गेल्यानंतर या पार्ट्या कशा काय बंद झाल्या? तुम्ही या पार्ट्या का रोखल्या नाहीत? असे सवाल करत मलिक यांनी फडणवीस यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण केले.
देवेंद्र फडणवीस यांनी काल, सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे गुन्हेगारी विश्वाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याचे पुरावे आपण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत फडणवीस यांचे आरोप खोडून काढले.
फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्यासाठी दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असे सांगितले गेले. पण माझे कधीच अंडरवर्ल्डशी संबंध आले नाहीत. जर कुणाचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत हे माहीत असताना मग त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही का कारवाई केली नाही. ज्या दिवशी तुमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा मी तोतया फडणवीस मंत्रालयात फिरत असल्याची टीका केली होती. तेव्हा मी तुम्हाला त्या तोतयाबद्दल माहितीही दिली होती. तो कुणासोबत उठतो, बसतो त्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. जर राजकीय डूख धरायचा असता तर मी ही माहिती आपल्याला दिली नसती, असे मलिक म्हणाले.