महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुण्यात स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी प्रविण दरेकरांशी बोलताना या कुटुंबानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी स्वप्नीलच्या आईला अश्रू अनावर झाले. “अजून किती मुलं जाण्याची सरकार वाट बघतंय”, असा जळजळीत सवाल स्वप्नीलच्या आई छाया लोणकर यांनी सरकारला विचारला आहे.
यावेळी छाया लोणकर यांनी सरकारी कारभार आणि नेतेमंडळींच्या भेटीगाठीवर देखील तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “१५ दिवस झाले. फक्त येऊन भेटून जातात. प्रत्येक जण आश्वासन देऊन जातात. सरकारनं ठाम सांगावं की आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. दोन महिन्यांनी सरकार कुणाचं का असेना, सरकारला आमच्या तिघांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील. आमच्या पोटचा गोळा गेला. आम्ही त्याला कसं शिकवलं आमचं आम्हाला माहिती. यांनी थोडे निर्णय आधीच घ्यायला हवे होते. दोन दोन वर्ष निर्णय लांबवले. करोना काळात दोन दोन महिने फक्त लॉकडाउन केलं होतं. बाकीचं सगळं चालूच होतं”, असं छाया लोणकर म्हणाल्या आहेत.