हिंडनबर्ग अहवाल प्रकरणावरून काँग्रेस पक्षाकडून उद्योगपती गौतम अदानींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बहुमूल्य असा वेळ वाया गेल्याचं दिसून आलं.एकीकडे, काँग्रेसकडून अदानींसंदर्भात जोरदार टीका होत असताना त्यांचाच सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र, या प्रकरणात वेगळी भूमिका घेतली आहे.
शरद पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेसला नक्कीच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सध्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आहेत. पण त्याचवेळी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीचं नातंही लपून राहिलेलं नाही. इतकंच नव्हे, तर शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मकथेत गौतम अदानी यांच्याबाबत उल्लेख केल्याचंही आढळून येतं.
या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील संबंध किती जुने आहेत, दोघांचा परिचय नेमका कसा झाला, याविषयी आपण या बातमीत जाणून घेऊ -
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मित्रत्वाचं नातं समजून घेण्याआधी पवार यांनी नेमकं काय म्हटलं, हे समजून घ्यावं लागेल.
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी म्हटलं की “हिंडनबर्ग अहवालामध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे.”
पवार यांनी अदानी यांचं समर्थन करताना म्हटलं, “एका परदेशी संस्थेने त्यांच्या बाजूने वक्तव्य केलं. या वक्तव्याने देशात गदारोळ माजला. अशा प्रकारची विधाने यापूर्वी काही जणांनी केली होती. त्यावरून संसद सभागृहात गोंधळही झाला होता.
“पण, यंदाच्या वेळी त्याला विनाकारण जास्त महत्त्व देण्यात आलं. हा अहवाल आणणारा कोण आहे, त्याचा विचार होणं आवश्यक होतं. आम्ही तर त्याचं नाव पूर्वी कधीच ऐकलेलं नव्हतं. त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचाही विचार व्हायला हवा होता."
"ते एखादा अहवाल मांडून मुद्दा समोर आणतात. देशात गदारोळ माजतो. त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतो. या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. याठिकाणी हिंडनबर्गने अदानी ग्रुपला लक्ष्य केलं असं वाटतं. भारताच्या उद्योग समूहावर हल्ला करण्यात आल्याचं दिसून येतं."
“या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने चौकशी समिती स्थापन केल्यामुळे विरोधी पक्षांकडून केल्या जात असलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या मागणीला आता अर्थ नाही,” असंही पवार यांनी म्हटलं आहे.
याबद्दल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही स्वतंत्र पक्ष आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सोबत असले तरी काँग्रेस घेत असलेली भूमिका नेहमीच राष्ट्रवादीने घेतली पाहिजे असं नाही."
चोरमारे यांच्या मते, "शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीचं नातं आहे. आज त्यांच्या प्रकरणावरील भूमिका जाहीर करून पवारांना स्वतःला काँग्रेसपासून वेगळं केलं आहे. अदानी यांच्याबाबत पसरवण्यात येत असलेली नकारात्मकता कमी करण्याचाही त्यांचा हेतू असू शकेल."
"पण याचा अर्थ त्यांनी अदानी यांना पूर्णपणे क्लिनचिट दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या समितीमार्फत होत असल्याने JPC ची गरज नाही, असं मत त्यांनी मांडलं. अर्थात, असं मत त्यांनी मांडलं म्हणजे ते लगेच भाजपसोबत जातील अशी सुतराम शक्यता नाही. त्यांनी केवळ या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे."
आत्मकथेत आवर्जून उल्लेख
शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मकथेत शरद पवारांचा आवर्जून उल्लेख केल्याचं दिसून येतं.
आत्मकथेतील पान क्रमांक 123 वर शरद पवार लिहितात, “गौतम अदानी नावाच्या तरूणाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे.
या तरूण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. कमालीचा कष्टाळू आणि साधाल. शून्यातून त्याने आपलं आजचं साम्राज्य उभं केलं.
लोकलमध्ये छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते. पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते.
त्यांनी चिमणभाईंकडे मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातील बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली.
गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज 50 हजार एकर जमिनीवर वसलेलं हे बंदर देशातील सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे.
पवारांच्या सल्ल्यानुसार वीज निर्मिती उद्योगात
शरद पवार सांगतात. गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, “वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोर उर्जानिमिर्ती क्षेत्रातही तुम्ही उतरा.
पवार लिहितात, “एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया येथे मी आणि गौतम एकत्र होतो. त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी पवार यांनी मदत करावी. मी म्हणालो, उद्योग येतील. पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेल. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात प्रकल्प उभा करावा. गौतम अदानी यांनीही त्यांच्या भाषणाला माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरील वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतम यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिथून 3 हजार मेगावॅट वीज निर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जानिर्मिती क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास 12 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत."
शरद पवारांनी हे कित्येक वर्षांपूर्वी लिहिलं होतं. आता वीज निर्मितीच्या उद्योगातील आघाडीचं नाव म्हणून गौतम अदानी हे संपूर्ण भारतात परिचित आहेत.
दरम्यान, सत्ता बदलली तरी गौतम अदानी यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध अद्याप कायम आहेत.
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्र्स्टने गेल्या वर्षी त्यांना फेलोशीप मिळवलेल्या विद्यार्थ्यांना फेलोशीप प्रदान करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.
तसंच मध्यंतरी आमदार रोहित पवार हे गौतम अदानींची गाडी चालवत त्यांना एका कार्यक्रमाला नेलं होतं.
1998 पर्यंत गौतम अदानी गुजरातचे मोठे उद्योगपती बनले होते. मोठ्या भावाच्या प्लास्टिक व्यवसायात प्रवेश 1988 ते 1992 मध्ये त्यांनी व्यवसाय प्रचंड वाढवला.
नंतर गौतम अदानी यांनी निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय पुढे 100 टनांवरून 40 हजार टनांपर्यंत जाऊन पोहोचला. मुंद्रा बंदराशी जोडल्यानंतर अदानी यांच्या व्यवसायाला मोठी उभारी मिळाली.
हिंडनबर्गमागे कोण आहे?
या कंपनीचे प्रमुख नेट अँडरसन आहेत. त्यांनी 2017 साली ही कंपनी स्थापन केली. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केला असून त्यांनी फॅक्ट सेट रिसर्च सिस्टम नावाची डेटा कंपनीत अँडरसन यांनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलं होतं.
रॉयटर्सच्या बातमीनुसार त्यांनी इस्रायलमध्ये काही काळ रुग्णवाहिका चालवली होती.
लोक तणावात कसं काम करतात हे आपण रुग्णवाहिका चालवताना अनुभवल्याचं अँडरसन लिंक्डीन प्रोफाइलवर लिहितात. त्यांना वैद्यक कामाचा 400 तासांचा अनुभव आहे असं ते सांगतात.
आपले रोल मॉडेल अमेरिकन अकाउंटंट हॅरी मार्कोपोलोस असल्याचे ते म्हणतात.
हॅरी यांनी 2008 साली बेनॉर्ड मॅडॉफ पॉन्झी स्कीममधील भ्रष्टाचाराची माहिती उघड केली होती.
हॅरी यांच्यावर नेटफ्लिक्सवर द मॉन्स्टर ऑफ वॉल स्ट्रीट ही मालिका प्रसिद्ध झाली होती.
अदानी प्रकरण : आतापर्यंत काय घडलं?
24 जानेवारी 2023 - हिंडनबर्गने अदानी यांच्यावरील संशोधनावर आधारित 'अदानी ग्रुप : हाऊ द वर्ल्ड्स थर्ड रिचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्टरी' हा अहवाल प्रसिद्ध झाला.
26 जानेवारी 2023 - अदानी ग्रुपने हिंडनबर्गचा अहवाल फेटाळून लावला. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा आपण विचार करत असल्याचंही अदानी ग्रुपने म्हटलं.
26 फेब्रुवारी 2023 - हिंडनबर्गने म्हटलं की आम्ही आमच्या अहवालावर ठाम आहोत. तसंच कायदेशीर कारवाईचं स्वागत आहे, असंही त्यांनी म्हटलं.
27 जानेवारी 2023 - अदानींनी 2.5 अब्ज डॉलरचा एफपीओ बाजारात आणला.
30 जानेवारी 2023 - या दिवसापर्यंत एफपीओला केवळ 3 टक्के सबस्क्रिप्शन मिळालं. याच दिवशी अबू धाबीतील इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने म्हटलं की आपल्या सबसायडिअरी ग्रीन ट्रान्समिशन होल्डिंग आरएससी लिमिटेडच्या माध्यमातून अदानींच्या एफपीओमध्ये 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
31 जानेवारी 2023 - इजराएलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना भेटण्यासाठी गौतम अदानी हायफा बंदरावर दाखल झाले होते. हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर पहिल्यांदाच अदानी सार्वजनिक ठिकाणी दिसले.
1 फेब्रुवारी 2023 - अदानी कंपनीने आपला एफपीओ रद्द केला.
2 फेब्रुवारी 2023 - कंपनीचे मालक गौतम अदानी यांनी 4 मिनिट 5 सेकंदांचा व्हीडिओ प्रसिद्ध करून एफपीओ मागे घेण्याचं कारण स्पष्ट केलं.
2 फेब्रुवारी 2023 - गुंतवणूकदारांमधील चिंतेचं वातावरण पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कंपनीला कर्ज देणाऱ्या कंपन्यांना त्यासंदर्भातील माहिती मागितली.
3 फेब्रुवारी 2023 - एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की बँकिंग सेक्टर चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक बाजारपेठा नियमांनुसारच काम करत असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या.
गौतम अदानींचा आजवरचा प्रवास
1978मध्ये कॉलेज सोडल्यानंतर मुंबईतल्या हिरे बाजारात गौतम अदानींनी नशीब आजमावल्याचं मीडियामध्ये छापून आलेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय.
1981मध्ये त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना अहमदाबादला बोलवून घेतलं आणि गोष्टी बदलू लागल्या. सामान गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकची एक कंपनी गौतम यांच्या भावाने विकत घेतली होती. पण ही कंपनी चालत नव्हती.
कंपनीला लागणारा कच्चा मालच मिळत नव्हता. या अडचणीचं रूपांतर संधीमध्ये करत अदानींनी कांडला बंदरावर प्लास्टिक ग्रॅन्युअल्स आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला.
1988मध्ये अदानी एंटरप्राईज लिमिटेडची स्थापना झाली. धातू, शेतीमाल आणि कापडासारख्या वस्तूंचा व्यापार ही कंपनी करत असे.
1994 पासून शेअरबाजारात
1994मध्ये या कंपनीची मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदणी झाली. त्यावेळी या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 150 रुपये. पण ही तर फक्त सुरुवात होती.1995मध्ये अदानी समूहाने मुंद्रा बंदराचं कामकाज पहायला सुरुवात केली. सुमारे 8 हजार हेक्टरमध्ये पसरलेलं अदानींचं मुंद्रा बंदर आज भारतातलं सगळ्यात मोठं खासगी बंदर आहे.
भारतामधल्या एकूण आयातीपैकी जवळपास एक चतुर्थांश मालाची आयात मुंद्रा बंदरात होते.
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासारख्या समुद्रकिनारा असलेल्या 7 राज्यांमधल्या 13 आंतरदेशीय बंदरांमध्ये अदानी समुहाचं अस्तित्त्वं आहे.यामध्ये कोळशावर चालणारं मोठं वीज निर्मिती केंद्र आणि विशेष आर्थिक क्षेत्रही (SEZ) आहे.
जगातला सर्वाधिक कोळसा उतरवण्याची मुंद्रा बंदराची क्षमता आहे.
स्पेशल इकॉनॉमिक झोन - SEZ खाली या बंदराची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे प्रमोटर कंपनीला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.
या झोनमध्ये वीज निर्मिती प्रकल्प, खासगी रेल्वे लाईन आणि एक खासगी विमानतळही आहे.जानेवारी 1999मध्ये अदानी समुहाने विल अॅग्री बिझनेस ग्रूप विल्मरसोबत खाद्यतेलाच्या उद्योगात पाऊल टाकलं.
आज देशात सर्वाधिक विक्री होणारं फॉर्च्युन खाद्यतेल अदानी - विल्मर कंपनी तयार करते.
फॉर्च्युन तेलासोबतच अदानी समूह कणीक (आटा), तांदूळ, डाळी, साखरेसारख्या डझनभर ग्राहकोपयोगी वस्तूंचीही निर्मिती करतो.2005मध्ये अदानी समूहाने भारतीय खाद्य महामंडळाच्यासोबत मिळून देशभरात प्रचंड मोठी गोदामं (Silos) म्हणजे कोठारं उभारायला सुरुवात केली. या कोठारांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ साठवले जातात.
सुरुवातीची 20 वर्षं अदानी समुहाने कंत्राटी पद्धतीवर देशातल्या विविधं राज्यांमध्ये ही गोदामं बांधली. या गोदामांपासून भारतातल्या विविध वितरण केंद्रांमध्ये तांदूळ नेणं सोपं व्हावं म्हणून या गोदामांना जोडण्यासाठी अदानी समुहाने खासगी रेल्वे मार्गही तयार केले.
सध्याच्या घडीला अदानी अॅग्री लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी देशातल्या भारतीय खाद्य महामंडळ आणि मध्य प्रदेश सरकारचा तांदूळ त्यांच्या गोदांमामध्ये साठवते. यामध्ये भारतीय खाद्य महामंडळाचा 5.75 लाख मेट्रिक टन तर मध्य प्रदेश सरकारचा 3 लाख मेट्रिक टन तांदूळ आहे.
अदानी उद्योगाचा पसारा कुठपर्यंत?
फॉर्च्युन इंडिया मासिकातल्या माहितीनुसार अदानींनी ऑस्ट्रेलियातल्या लिंक एनर्जीकडून साल 2010मध्ये 12 हजार 147 कोटींना कोळशाची खाण विकत घेतली.
गेली बेस्ट क्वीन आयलंडमधल्या या खाणी 7.8 अब्ज टनांचं खनिज आहे आणि दरवर्षी इथे 6 कोटी टन कोळशाची निर्मिती होऊ शकते.इंडोनेशियामध्ये तेल, गॅस आणि कोळशासारखी नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. पण पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या संपत्तीचा फायदा या देशाला घेता येत नव्हता.
इंडोनेशियाच्या दक्षिण सुमात्रामधून कोळसा काढण्यासाठी दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा अदानी समूहाने 2010मध्ये केली होती. यासाठी दक्षिण सुमात्रामध्ये तयार करण्यात येणाऱ्या रेल्वे योजनेसाठी तिथल्या क्षेत्रातल्या सरकारसोबतच्या करारावर सह्यादेखील करण्यात आल्या.
अदानी समूह 5 कोटी टनांची क्षमता असणारं कोळसा हाताळणारं बंदर अदानी समूह तयार करणार असून दक्षिण सुमात्राच्या बेटांतल्या खाणींमधून कोळसा काढण्यासाठी 250 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकण्यात येणार असल्याचं तेव्हा इंडोनेशिया गुंतवणूक मंडळाने सांगितलं होतं.2002मध्ये अदानी साम्राज्याची उलाढाल होती 76.5 कोटी डॉलर्स. 2014मध्ये ही उलाढाल वाढून 10 अब्ज डॉलर्स झाली.
2015 सालानंतर अदानी समुहाने सैन्यासाठी संरक्षण उपकरणांचा पुरवठा करण्याचं कामही सुरू केलं. काही काळानंतर त्यांनी नैसर्गिक वायू क्षेत्रातील उद्योगाचा विस्तार केला. 2017मध्ये अदानी समुहाने सोलर पीव्ही पॅनल बनवायला सुरुवात केली.
2019मध्ये अदानी समुहाने विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला. अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरमसारख्या 6 विमानतळांचं आधुनिकीकरण आणि कामकाज यांची जबाबदारी अदानी समुहाकडे आहे. 50 वर्षं अदानी समूह या विमानतळांचं कामकाज, व्यवस्थापन आणि विकासकाम पाहील.
गौतम अदानींच्या नेतृत्त्वाखालच्या अदानी समुहाकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची 74 टक्के भागीदारी आहे. दिल्लीनंतरचा मुंबई हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे.
Published By- Priya Dixit