मुंबई नाका परिसरात एका बंद गाळ्यामध्ये चक्क मानवी अवयव सापडल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे, हा गाळा मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या मागच्या बाजूस आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना ११२ या हेल्पलाईनवर फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असा हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका येथील हरीविहार सोसायटीत २० आणि २१ क्रमांकाचे दोन गाळे आहेत. हे गाळे अनेक वर्षांपासून बंद आहेत. तसेच, हे गाळे शुभांगिनी शिंदे यांच्या मालकीचे आहेत. या गाळ्याच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले होते.
त्यामुळेच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांचे पथक येथे दाखल झाले. गाळा उघडताच तेथे अनेक भंगार सामान आढळून आले. तसेच, या गाळ्यात प्लास्टिकच्या दोन बाटल्यांमध्ये मानवी अवयव आढळून आले आहेत. या बाटल्यांमध्ये ८ कान, मेंदू, डोळे आणि अन्य अवयव आढळले आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी गाळामालक शिंदे यांना चौकशीसाठी पाचारण केले. शिंदे यांची दोन्ही मुले ही डॉक्टर आहेत. त्यात एक जण नाक, कान घसा तज्ज्ञ तर दुसरा डेन्टिस्ट आहे. त्यामुळे या डॉक्टर मुलांनीच ते अभ्यासासाठी हे अवयव वापरले की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
विशेष म्हणजे, गाळा कधीपासून बंद आहे, यापूर्वी कुणाला भाड्याने दिला होता, यासह अनेक बाबींची उत्तरे शिंदे यांनी समाधानकारकरित्या दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे सर्व मानवी अवयव अत्यंत शार्प पद्धतीने कापण्यात आली आहेत. ती येथे कशी आली, कुणी आणली, यासह अनेक बाबींचा उलगडा करण्यासाठी पोलिस फॉरेन्सिक पथकासह अन्य तंत्रज्ञानाची मदत घेत आहेत. तूर्त गाळामालक आणि त्यांची दोन्ही डॉक्टर मुले यांची चौकशी केली जात आहे.