मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या क्राँक्रिटीकरण कामाला अखेर सुरुवात झाली आहे. विरार-खानिवडे टोल नाक्यापासून मुंबईच्या दिशेने दुरुस्ती काम करण्यात येत आहे.वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाकरता नोव्हेंबर महिन्यात विरार येथे आले असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर ते तलासरी या दरम्यानचा रस्ता १२ पदरी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. या कामासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली होती.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग बांधला तेव्हापासून येथे प्रचंड अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे नाव मी डेथ ट्रॅप ठेवले होते. येथे खूप अपघात होतात. त्यामुळे १२१ किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद महामार्ग सिमेंट काँक्रिटचा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती.
या अंतर्गत नागरिकांच्या सुविधेसाठी ६ अंडरपास १० फूट ओव्हर ब्रिजसुद्धा करण्यात येणार आहेत. या कामाचा खर्च ६०० कोटी रुपये एवढा आहे. प्रस्तावित दिल्ली-मुंबई महामार्गदेखील वसईशी जोडला जाणार आहे. यामुळे वसईकरांना थेट मुंबईत जाता येईल, असेही ते म्हणाले होते.
दरम्यान, पावसाळ्यात महामार्गाची दुरवस्था झाली होती. वरसोवा पूलापासून वसईच्या हद्दीत अनेक भागात पावसाचे पाणी साचून महामार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होत होती. पावसाळ्यात मोठाले खड्डे पडल्यानंतर वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत होता. अवघ्या पाच-सात किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल चार-पाच तास लागत होते.
Edited by -Ratnadeep Ranshoor