राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “मला अद्याप कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. कारण रामलल्ला सर्वांचा आहे. माझी एकच विनंती आहे की, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट होऊ नये. रामलल्ला एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही. कोट्यवधी रामभक्तांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“बाबरी मस्जिद विरुद्ध राम मंदिरप्रकरणी निर्णय कोर्टाने घेतला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला नाही. बाबरी ज्यांनी पाडली त्यातील अनेकजण हयात नाहीत. काहीजण शाळेतील पिकनिकसाठी त्यावेळी गेले असतील. पण सर्वांसाठी हा निर्णय श्रद्धेचा आहे”, असंही ठाकरे म्हणाले. “मला आमंत्रणाची गरज नाही. माझ्या मनात आलं तर मी आता जाऊन दर्शन घेऊ शकतो. मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यानंतरही मी तिथे जाऊन आलो होतो”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Edited by -Ratnadeep Ranshoor