लोकसभा निकालामध्ये फरक दिसला नाही तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही, असे आव्हान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात बॅलेट पेपरच्या माध्यमातून फेरनिवडणूक घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईव्हीएम यंत्र सदोष असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी त्यांनी म्हटले की, कुठलीही मशीन ही माणूसच तयार करतो. त्यामुळे ईव्हीएम यंत्र पूर्णपणे सदोष आहे, असे म्हणणे चुकीचे ठरले. माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचं काय घेऊन बसलातं? जर संगणक हॅक होऊ शकत असेल तर ईव्हीएम यंत्र हॅक होईल, अशी शंका उपस्थित करण्यात काय गैर आहे, असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला.