आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो, कर्जमाफी केल्यास सरकारला धक्का लागू देणार नाही, असं म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये कृषी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी खरेदी, समृद्धी मार्ग, बुलेट ट्रेन, नोटाबंदी अशा सर्व विषयावर बोलताना सरकारवर टीका केली.
या पुढे देशामध्ये एकतर्फी मन की बात ऐकणार नाही शेतकऱ्याला पण मन आहे आणि त्याला बोलतं करण्यासाठी आज त्यांना बोलावलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसोबत मनमोकळा संवाद साधला. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी समृद्धी नको, शेतकऱ्याला उध्वस्त करणारा महामार्ग नको असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.