मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामधील आरोपसत्राला काही पूर्णविराम लागायचा दिसत आहे. संजय राऊत यांनी ईडी आणि एनआयएला सोमय्यांना ताब्यात घेण्याचे आव्हान दिले आहे.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा आणखी एक भ्रष्टाचार उघड केला आहे. राऊत म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी लिमिटेड कंपनीमध्ये ईडीची रेड पडली आहे.
या मेट्रो डेअरीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कंपनीकडून सोमय्यांच्या खात्यात लाखो रुपये आले आहेत. कालही मी या प्रकारच्या कंपन्यांची नावे घेतली होती. जवळपास 150हून अधिक कंपन्यांकडून सोमय्यांना पैसा मिळाला आहे.
त्यांच्याशी सोमय्यांचा व्यवहार झाला. ईडीत (ED) हिंमत असेल, एनआयएमध्ये हिंमत असेल तर या कंपन्या आणि सोमय्यांचे काय संबंध आहेत हे सांगा. ईडीने स्युमोटो अॅक्शन घेऊन सोमय्यांना ताब्यात घ्यावं आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.
मेट्रो डेअरी कंपनीकडून चेक मार्फत सोमय्यांच्या प्रतिष्ठानच्या खात्यात रक्कम आल्याचं सांगत याबाबतचे कागदपत्रंही संजय राऊत यांनी दाखवली आहेत.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्यांचं प्रतिष्ठान आहे. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतील ते स्वत:ला महात्मा समजतात. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करणार हे त्याचं वाक्य आहे. पण भ्रष्टाचाराची सुरुवात त्यांनीच केली.
दोन दिवसापासून युवक प्रतिष्ठानच्या खात्यात जे पैसे आले त्याची माहिती मी देत आहे. दीडशेहून अधिक कंपन्या आहेत. ईडी आणि सीबीआयची चौकशी असलेल्या या कंपन्यांकडून सोमय्यांना लाखो करोडोचे डोनेशन मिळाले आहे. तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढताना मग डोनेशन कसे घेतले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
ईडीने स्यू मोटो अॅक्शन घेतली पाहिजे. हा फक्त चेक आहे. थोडा चेक आणि थोडे पैसा असा व्यवहार युवक प्रतिष्ठानशी या कंपन्यांनी केला आहे. हे नवलानी पार्ट टू आहे.
तुम्ही इतरांवर स्युमोटो कारवाई करताना आता ईडी, सीबीआयने सोमय्यांना तात्काळ ताब्यात घेऊन हा पैसा कुठून आला त्याची चौकशी सुरू करावी. कॅशची माहिती माझ्याकडे आहे. चेकचीही आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.