परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दोपोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मुद्दयावरून भाजपा नेते किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज दापोलित दाखल झाल्यानंतर सोमय्या यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तुमच्यात हिम्मत असेल तर अनिल परबचा रिसॉर्ट वाचवून दाखवा. पण मी तोडून दाखवणार, असे थेट आव्हान किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
अनिल परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. सोमय्यांना दापोलीत येण्याआधीच खेड पोलिसांनी कशेडी घाटात थांबवत नोटीस देण्याचा प्रयत्न केला. खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला.दरम्यान दापोलीत दाखल होताच किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
दिवाळीत आल्यावर दापोलीकरांना वचन दिलं होतं की,अनिल परबची माफियागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही. समजतात काय स्वत:ला. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला आणि अनिल परबचा रिसॉर्ट तोडणार असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे. तसेच मोदी सरकारनं दापोली कोर्टात अनिल परब विरोधात फौजदारी कारवाई करावी असं अपील केले असल्याची माहिती दिली.
तसेच मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो. तुमच्यात हिम्मत असेल तर अनिल परबचा रिसॉर्ट वाचवून दाखवा. मी तोडून दाखवणार, असे आव्हानच ठाकरे सरकारला दिले आहे. हा प्रतिकात्मक हातोडा परबचा रिसॉर्ट पाडण्यासाठी आणलाय पण ठाकरे सरकारचा एक एक भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले.