विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. गेले काही दिवस अजित पवार यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपिचंद पडळकर अनेक आरोप करत आहेत.
काल पवार यांनी राजकीय विरोधक आहे म्हणून खोट्य़ा गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही असा इशारा दिला. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
अजित पवार म्हणाले, “आपल्या नागरिकांसोबत काहीही चुकीचं घडलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न… कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. याआधी अशाचप्रकारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांनी अतिशय त्रासून राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु त्यानंतर शरद पवारांनी त्यांना समजावून सांगितलं. मी आणि जयंत पाटीलही आव्हाडांना भेटायला गेलो. त्यातून आम्ही मार्ग काढला.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही जवळपास साडेसतरा वर्षे सरकारमध्ये काम करत होतो. तेव्हाही आमच्यासमोर विरोधीपक्ष होता. तेव्हा आम्ही अशाप्रकारचा प्रयत्न कदापि केला नाही. त्यामुळे आता या रस्त्याने जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते सहन करणार नाही. जाणीवपूर्वक कुणाला गोवण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा राजकीय विरोधक आहेत, म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष म्हणून आम्हीही हे सहन करणार नाही.”
Published By -Smita Joshi