26 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान कोल्हापुरात महालक्ष्मी महाउत्सव कार्यक्रम होणार असल्याचे शहरात होर्डिंग लागले आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या कार्यक्रमाशी देवस्थानचा संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर कोल्हापूर महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. या कार्यक्रमाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने हा महाउत्सव आयोजित केला आहे. शहरभरात ठिकठिकाणी या कार्यक्रमाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र हा महाउत्सव आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंत्रोच्चाराने विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा या होर्डिंगवर करण्यात आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे.
जाहिरातीवर,श्री कोल्हापूर महालक्ष्मी असा उल्लेख केल्याने अनेक भाविक कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संपर्क करून या कार्यक्रमाची माहिती विचारत आहेत. मात्र, या कार्यक्रमाची अंबाबाई मंदिर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नाही. केवळ नावात साम्यता ठेवून अशा पद्धतीच्या इतर संस्था हे कार्यक्रम करत असल्याचं देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देखील या कार्यक्रमाची चौकशी केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. विधी तज्ञांशी बोलून कारवाई
इतकंच नाही तर संबंधितांवर देवस्थान समितीच्या विधीज्ञांशी बोलून कायदेशीर कारवाईबाबत देखील विचार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor