नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. आयकर विभागाने २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर हे छापे टाकले होते. यावेळी एकूण पंधरा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. यात आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक दिवस-रात्र ही कारवाई करत होते. २० एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली. यात ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी व्यावसायिकांच्या ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले. त्यात अधिकाऱ्यांना व्यावसायिकांचे ३३३३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले असून साडेपाच कोटींची रोकड व दागिने जप्त करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान सलग ६ दिवस ही कारवाई सुरु होती. नाशिकमध्ये राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते यांची यामध्ये गुंतवणूक आहे. जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे ३३३३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor