अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सोलापुरातील पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाला. पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर शाई फेकली आणि निषेध नोंदवला. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी सुरू होताच काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर शाईफेक केली.
या घटनेनंतर बोलताना सदावर्ते आक्रमक झाले. संविधान दिनी हे वागणं चुकीचं आहे. आम्ही शिवरायांचे खरे मावळे आहोत. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वातंत्रवीर सावरकर ज्या जेलमध्ये होते तिथे आम्ही उपवास करून आलेली माणसं आहोत. पाकिस्तानच्या सीमेवर आमचे भाऊ उभे असतात आणि ते पाकिस्तानला डोळे वर करून सुद्धा पाहू देत नाहीत. त्या वंशावळीतून आम्ही आलो आहोत. तेव्हा या सर्व गोष्टी आम्हाला पाणी कम चाय आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हातात असताना ही शाई फेकली. आम्ही अशा लोकांना घाबरत नाही. या लोकांना आम्ही उत्तर देऊ. महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन. राज्यात असंवैधानिक वागण्याची आधीच खबरदारी घेतली पाहिजे. परंतु याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor