Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?, सामना अग्रलेखातून सवाल

त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत?, सामना अग्रलेखातून सवाल
, सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (08:45 IST)
शिवसेनेनं सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचा सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. “सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. ‘ठाकरी’ भाषेतच बोलायचे तर सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस ११० दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते. सबब, या सगळ्यांवर महाराष्ट्र सरकारनं अब्रुनुकसानीचा दावाच ठोकला पाहिजे,” असं टीकास्त्र शिवसेनेनं डागलं आहे.
 
“सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!,” असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा आंबोली घाटात ब्लॅक पँथर दिसला