जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे चार हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक व महिला सरपंचाच्या पतीला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे व महिला सरपंचाचे पती शिवदास भुरा राठोड असे दोन्ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी कि, पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे रोजगार हमी योजना राबवली जाते. या योजनेच्या मानधन आदेशावर सही घेण्यासाठी तक्रारदार काशिनाथ सोनवणे आणि सरपंचाकडे गेले होते. परंतु, या आदेशावर सही करण्यासाठी सोनवणे आणि महिला सरपंचाचे पती शिवदास राठोड यांनी तक्रारदाराकडे सहा हजार रुपयांची लाच मागितली असता तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबतची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचत सोनवणे आणि राठोड यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.