साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे.
सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे. तसेच जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर बुधवारी सकाळी दाखल झाले होते. किरीट सोमय्या यांनी यावेळी शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल असं सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे.