युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन येणारे पहिले विशेष विमान आज मध्यरात्री दिल्लीत 3:30 वाजता दाखल झाले. त्यात महाराष्ट्रतील 27 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार ने 'ऑपरेशन गंगा' मोहीम सुरु केली असून या अंतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या एअर इंडिया च्या 'एआय 1942' या विशेष विमानाने बुखारेस्ट रोमानिया येथून 250 विद्यार्थी आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री दाखल झाले. विविध राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 27 विद्यार्थी समाविष्ट आहे.
महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार, विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात आले आहे. दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुखरूप पोहोचता यावे या साठी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आले आहे.
या कक्षाच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन आणि सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.
तसेच या कक्षाच्या माध्यमातून विमानतळाहून ने-आण करण्याची सोय देखील केली आहे.
या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे त्यांच्या स्वगृही सुखरूप पोहोचविण्यात येत आहे.
दरम्यान एअर इंडियाचे 'ए आय- 1940' हे दुसरे विमान रोमानियातून विद्यार्थ्यांना घेऊन येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
युक्रेन मधून परत येणाऱ्या भारतीय विद्यार्थी हे विविध राज्याचे असल्यामुळे त्यांना आप आपल्या राज्यात सुखरूप पोहोचता यावे या साठी परराष्ट्रात व्यवहार मंत्रालयाने दिल्लीतील विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहे.या नुसार इंदिरागांधी विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्याचे मदत कक्ष स्थापित केले आहे.