पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली असल्याचे वृत्त होते. यामुळे खळबळ उडाली होती.
शिर्डीसह नगर जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियांवर हे वृत्त फिरत होते.याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली. सदरचे वृत्त निरर्थक व निराधार असून भाविकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी याबाबत मंगळवारी एक प्रसिध्दीपत्रक काढून ही माहिती दिली. रेकीचे वृत्त पुढे येताच जिल्हा पोलीस दल सर्तक झाले. त्यांनी याबाबत खात्री केली.
जिल्हा पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेत तपास यंत्रणाशी संपर्क साधून खात्री केली असता शिर्डीसह नगर जिल्ह्यात दहशतवादांनी रेकी केल्याची घटना कुठेही घडली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवादांची वक्रदृष्टी असून दुबईवरून आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याचे वृत्त निरर्थक व निराधार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी म्हटले आहे. साईबाबा मंदिर आतंरराष्ट्रीय देवस्थान असून दर्शनास येणार्या भाविकांनी व स्थानिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
काय म्हणाले अहमदनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक?
शिर्डीत दहशतवाद्यांकडून रेकी झाल्याची माहीती चुकीची आहे. शिर्डी तसेच अहमदनगर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रेकी केल्याचा कुठलाही प्रकार घडलेला नाही. यासंदर्भात संबंधित सर्व तपास यंत्रणाकडून माहीती घेण्यात आली आहे. यामुळे माध्यमांमधून देण्यात आलेले वृत्त निराधार आहे, अशी माहिती अहमदनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.