Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्र्यंबकच्या स्वामी समर्थ गुरुपीठाद्वारे होत असलेल्या आर्थिक शोषणाची चौकशी करावी

shradha andhshradha
, मंगळवार, 17 मे 2022 (21:38 IST)
स्वामी समर्थ केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्या द्वारे धर्माच्या, अध्यात्माच्या नावाखाली ,त्यांच्या विविध केंद्रांमधून मागील अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा पसरवणे,जादूटोणा-करणी असते, करता येते, असे भक्तांच्या मनात बिंबविणे, वैश्विक शांतीसाठी अवैज्ञानिक पद्धतीने यज्ञयाग,होमहवन करण्याचा दिखावा करणे, छद्मविज्ञानाचा वापर करून चमत्कार सदृश्य गोष्टी पटवणे, विविध प्रकारची भोंदूगिरी करणे असे प्रकार चालतात, असे महाराष्ट्र अंनिसला दिसूनआले आहे. त्या बद्दल समितीने वेळोवेळी मा.जिल्हा अधिकारी आणि संबंधितांना निवेदने देऊन, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
 
अंनिसने निवेदनात म्हटले आहे की, समाजातील विविध क्षेत्रातील विविध समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींना अध्यात्माच्या नावाने मोहिनी घातली जाते.समाजावर धार्मिक श्रद्धांचा पगडा असल्याने आणि अनेक लहानमोठ्या समस्यांवर या तथाकथित अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेल्या कर्मकांडांतून मार्ग निघेल ,ह्या भाबड्या आशेने सेवेकरी यांचा मोठा गोतावळा आपोआप तयार होतो किंवा चलाखीने जमविला जातो. त्यांना, त्यांच्या गंभीर समस्यांवर दैववादी तोडगे ,उपाय,होमहवन, जपजाप्य, उपासना अशा अवैज्ञानिक बाबीं,कर्मकांडे करायला सांगून, मूळ समस्येपासून दूर ठेवले जाते. त्यामुळे ही सेवक मंडळी दैववादावर विसंबून राहतात. भोंदूगिरीत अडकल्याने स्वामी समर्थांचा हा सेवेकरी समस्यांवर वैज्ञानिक उपाय करण्यापासून सतत दूर राहतो किंवा विलंब करतो. त्यामुळे अनेक जीवघेण्या संकटांना सेवेकरी सतत सामोरा जात असतो, असे निवेदनात म्हटले आहे.
 
अंनिसने निवेदनात लिहीले आहे की, आपण खरोखर खूप अध्यात्मिक कार्य करीत आहोत,अशी धार्मिक भावना हा सेवेकरी बाळगून असतो. त्यातून अनेक निरर्थक कर्मकांडे सातत्याने हा सेवेकरी करीत राहातो.त्यात त्यांचा मुबलक वेळ, श्रम,पैसा वाया जातो.मात्र ह्या तथाकथित अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेल्या केंद्रातील विश्वस्त व संचालक यांना ,यातून प्रचंड प्रमाणात पैसा आणि प्रतिष्ठा मिळते, साहजिकच त्यांचे अनेक राजकीय,शासकीय लागेबांधे तयार झालेले असतात, त्यामुळे त्यांना विरोध करायला कुणी धजावत नाही , असे महाराष्ट्र अंनिसचे निरीक्षण आहे.
 
मागील आठवड्यात नाशिक येथील स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या सविस्तर वृत्तावरून असे लक्षात येते की, स्वामी समर्थ केंद्राच्या विश्वस्तांनी, संचालकांनी अध्यात्माच्या नावाखाली समाजातील अनेकांच्या धार्मिक श्रद्धांचा, अज्ञानाचा, अगतिकतेचा गैरफायदा घेऊन प्रचंड प्रमाणात आर्थिक शोषण केले असावे,असा दाट संशय अंनिसला आहे. म्हणून मा.जिल्हा अधिकारी नाशिक यांनी याबाबत सखोल चौकशी करून, स्वामी समर्थ केंद्र( दिंडोरी प्रणीत) यांच्या द्वारे पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा थांबवाव्यात आणि आतापर्यंत अंधश्रद्धांच्या माध्यमातून जर संबंधितांनी सेवकांचे,समाजाचे,शासनाचे आर्थिक फसवणूक व शोषण केले असेल तर, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य सरचिटणीस डाॅ. ठकसेन गोराणे ,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड समीर शिंदे, बुवाबाजी विरोधी संघर्ष जिल्हा सचिव महेंद्र दातरंगे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी नाशिक यांचेकडे केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संपूर्ण नाशिक शहरात या दोन दिवशी पाणी पुरवठा नाही