Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'50 खोक्यां'चा आरोप शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी ठरतोय का?

uddhav shinde fadnavis
, शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (12:45 IST)
'50 खोके एकदम ओके' एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या या घोषणेची सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. बैलपोळा, दिवाळी, होळीसारख्या सणावारात या वाक्याचा लोक सर्रास वापर करू लागलेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंड केलं असा आरोप सातत्याने करत आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदार बेचैन झालेत. 
 
अपक्ष आमदार बच्चू कडूंनी "हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा डाग कामयचा मिटला पाहिजे. गावोगाव लोक 50 खोके बोलतायत," असं म्हणत शिंदे-फडणवीसांवर नाराजी व्यक्त केलीये. 
 
दुसरीकडे, सरकार स्थापन होऊन चार महिने झाले. पण, शिंदे-फडणवीसांना 50 खोक्यांचा आरोप पुसता आलेला नाही. त्यामुळे 50 खोके शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी ठरतायत का? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
 
'50 खोक्यांचे आरोप मिटवा नाहीतर....' 
 
आत्तापर्यंत विरोधकांकडून शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोप होत होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आमदार रवी राणांनी हा आरोप केलाय. त्यामुळे रवी राणा आणि शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालंय.  
 
काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले होते, "बच्चू कडूंना कोणताही पक्ष नाही. खोके आणि ओके त्यांचा पक्ष आहे. गुवहाटीला बच्चू कडू जाणं म्हणजे, बिना खोक्यांनी त्यांचा पत्ता हलत नाही."
 
त्यावर रवी राणांनी माझ्यावर 50 खोक्यांचा आरोप केला असं म्हणत बच्चू कडू चांगलेच संतापले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट नोटीस देण्याची आक्रमक भूमिका घेतली.
 
ते म्हणाले, "हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. गावागावात लोक 50 खोक्यांबद्दल विचारतात. आता आमच्यासमोर उभं रहाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. आमची सातत्याने बदनामी केली जातेय." 
 
बच्चू कडूंनी, राणा यांना आरोप सिद्द करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलीये. शिंदे गटातील 8 अपक्ष आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही लवकरच निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय.
 
बच्चू कडू पुढे म्हणाले, "या आरोपामुळे 50 आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. की गुवहाटीला जाण्याचे 50 कोटी तुम्ही दिले."  
 
बच्चू कडू आणि रवी राणा अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व करतात. एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंना कॅबिनेट मंत्रिपदाचं आश्वासन दिलंय. तर, राणा यांची मंत्रिपदी वर्णी लागेल अशी चर्चा सुरू आहे. 
 
राजकीय जाणकार सांगतात, या दोन्ही नेत्यांचं राजकारण स्थानिक आहे. हे आरोपप्रत्यारोप म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असू शकतो. 
 
50 खोके लोकांच्या तोंडी बसलेत? 
शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेकडून '50 खोके एकदम ओके' चा प्रचार सुरू झाला. रस्त्यावर, जाहीर सभेत, गावागावात, विधिमंडळात शिवसेनेने शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे 50 खोक्यांचा प्रचार पहाता-पहाता राज्यभरात पोहोचला. 
 
उद्धव ठाकरेंनी तर शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यात शिंदे गटातील आमदारांचा 'खोकासूर' म्हणून उल्लेख केला होता. 
 
राजकीय विश्लेषक दीपक भातूसे याबाबत सांगतात, "50 खोके एकदम ओके, ही घोषणा आता गावागावात पोहोचली आहे. हे वाक्य लोकांच्या तोंडी बसलेलं आहे. लोकांना असं वाटायला लागलंय की आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंडखोरी केलीये." 
 
दुसरीकडे, सोशल मीडियातील मीम्समुळे ही घोषणा लोकांपर्यंत पोहोचली. ग्रामीण भागात 50 खोक्यांची जोरदार चर्चा ऐकायला मिळतेय. दिवाळीत रांगोळी, बैलपोळ्यात बैलांच्या अंगावर ही घोषणा लिहिल्याचं पाहायला मिळतंय. यामुळेच शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झालेत. 
 
राज्यातील अनेक भागात शिंदे गटातील आमदारांसमोर शिवसैनिकांकडून ही घोषणाबाजी झाल्याचं दिसून आलंय. आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लादेखील केला होता.
 
50 खोके लोकांच्या मनात का बसलेत? यावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले, "हा नॅरेटिव्ह आता लोकांमध्ये सेट झालाय. याआधी आघाडी सरकार जाण्यास ठाकरेंचा तुललेला संपर्क, अयशस्वी नेतृत्व जबाबदार होतं असा नॅरेटिव्ह (समज) होऊ लागला होता. पण, या घोषणेमुळे हे फक्त पैशांसाठी झालं हा नॅरेटिव्ह सेट करण्यात उद्धव ठाकरेंना यश आलंय."
 
50 खोक्यांचा आरोप शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी ठरतोय? 
सूरत, गुवहाटी आणि गोवामार्गे राज्यात सत्तांतर घडलं. पण सत्तांतर होत असताना शिवसेनेने शिंदेंसोबत जाणाऱ्या प्रत्येक आमदाराला 50 कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप केला. 
 
एकनाथ शिंदेंनी हा उठाव तत्व, विचार आणि उद्धव ठाकरेंच्या अयशस्वी नेतृत्वाविरोधात असल्याचं वारंवार सांगून आरोपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. अभय देशपांडे सांगतात, "शिंदेंचा हाच नेरेटिव्ह खोडून काढण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत." 
 
राज्यात सरकार स्थापन होऊन चार महिने लोटले आहेत. पण अजूनही 50 खोक्यांचा आरोप शिंदेंना पूर्णत: पुसून टाकला आलेला नाही. शिंदे गटावरील हा आरोप पुसला जाऊ शकेल का? याबाबत दीपक भातूसे सांगतात, "पैसे घेऊन आमदारांनी बंडखोरी केली हे संशयाचं वातावरण कायम राहाणार. 50 खोक्यांचा चिकटलेला आरोप मिटणार नाही. कितीही स्पष्टीकरण दिलं तरी तो पुसता येणार नाही."
 
राजकीय जाणकार म्हणतात, अनेक रिपोर्ट आले, कमिटी बसल्या चौकशी झाली.  पण, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर लागलेला सिचंन घोटाळ्याचा आरोप अजूनही पुसला गेलेला नाही. "ही तर सुरुवात आहे. येणाऱ्या निवडणुकात शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. कारण या घोषणेचा राजकीय वापर करण्यात येईल," दीपक भातूसे पुढे म्हणाले. 
 
अंधेरी पोट-निवडणुक असो किंवा आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा. 50 खोक्यांचा आरोप सातत्याने शिंदे गटावर करण्यात आला. आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा खासकरून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात काढली होती. 
 
शिंदे-फडणवीस 50 खोक्यांचा आरोप पुसण्यात असमर्थ का ठरतायत? याबाबत बोलताना अभय देशपांडे म्हणाले, "बंड फक्त पैशांसाठी झालंय हा आरोप पुसून काढण्यात शिंदे-फडणवीसांना यश आलेलं नाही." तर, "लोकांच्या तोंडी हा आरोप बसल्यामुळे खोडून काढणं शिंदे-फडणवीसांना शक्य नाही" असं दीपक भातूसे यांना वाटतं.  
 
राज्यात विधानसभेच्या निवडणुकांना दोन वर्षं आहेत. त्याआधी मुंबई, पुणे आणि इतर महापालिका निवडणुका होतील. 50 खोक्यांचा प्रचार या निवडणुकीत शिंदे-फडणवीसांसाठी त्रासदायक ठरेल? याबाबत देशपांडे म्हणतात, "50 खोक्यांचं नॅरेटिव्ह आता लोकांमध्ये चर्चेत असलं तरी याचा परिणाम किती काळापर्यंत होईल, हा प्रश्न आहे. विधानसभेपर्यंत ही मोहीम टिकेल का? यावर सर्व अवलंबून आहे." 
 
राजकीय विश्लेषकांच्या मते, महापालिका निवडणुकीच्या निकालांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. 50 खोके घोषणा चर्चेत असूनही मतदानावर याचा परिणाम होतोय का, हे निवडणुकीनंतरच कळेल. 
 
बच्चू कडूंची धमकी मंत्रीपदासाठी? 
उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. मंत्रिपदाचा राजीनामा देत ते शिंदे गटासोबत गेले. त्यांची मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. 
 
मग राणांविरोधातील मोहिमेआडून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधतायत? दीपक भातूसे सांगतात, "बच्चू कडूंचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होत नाहीये. एकीकडे मंत्रिपद नाही आणि दुसरीकडे ग्रामीण भागात लोक डिवचत आहेत. हा दुहेरी मार असल्यामुळे शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढतेय." 
 
रवी राणा प्रकरणाआडून मंत्रिपदासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो, असं ते पुढे म्हणाले. 
 
बच्चू कडू मंत्रिपद सोडून आल्यामुळे अस्वस्थ आहेत असं काही राजकीय विश्लेषक सांगतात. अभय देशपांडे म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्तार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत होतो की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे या आमदारांची अस्वस्थता स्वाभाविक आहे."
 
बच्चू कडूंच्या भूमिकेबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, "बच्चू कडू लवकरच मंत्रिपदी दिसतील. त्यांनी संयम बाळगायला हवा." 
 
तर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी, "सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये असा विसंवाद योग्य नाही. हा वाद टोकाला जाईल असं वाटत नाही," अशी प्रतिक्रिया दिली.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आग्रा :वऱ्हाडीत रसगुल्ला न दिल्यावरून झालेल्या वादात तरुणाची हत्या