विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे आणणार अशी घोषणा काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार असताना फडणवीस यांनी केली होती. कृषी कायद्यांचं महत्त्व सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून बैलगाडी मोर्चा काढला आणि त्यानंतर त्यांनी हे कायदे शेतकरी हिताचे कसे आहेत हे देखील आपल्या भाषणात सांगितलं. यावर संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याजवळ असलेल्या बैलांचंही पोषण करण्याची ताकद उरलेली नाही.” असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.