पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. खरे पाहता देशातील क्रुड ऑईल रिफाईण्ड करून ते पेट्रोल आपण परदेशात ३८ रुपयांना विकतो, मात्र देशात वा देशाबाहेर निर्माण झालेले हेच क्रुड ऑईल इथे विकताना मात्र पेट्रोलचा दर ८७ ते ८८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ही महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेची लूट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. मध्यमवर्गीय, गरीब जनता, शेतकरी हे महागाईमध्ये होरपळत आहेत आणि याला भाजप सरकार जबाबदार असल्याचे पाटील म्हणाले.
एकेकाळी ५८ रूपये पेट्रोलचे दर असताना पेट्रोल महाग असल्याची हेच भाजपवाले ओरड करायचे आणि आज त्यांच्या कार्यकालात पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली आहे. लवकरच रुपयाची घसरण शंभरी गाठेल, पेट्रोलचे दर शंभरी गाठतील, त्याप्रमाणेच भाजपच्या खासदारांची संख्याही घटून शंभरीवर येईल, असा टोला पाटील यांनी लगावला. आपल्यासारख्या कमी दरडोई उत्पन्न असलेल्या देशात इंधनाचे इतके चढे दर परवडणारे नाहीत आणि जनतेच्या असंतोषाचा फटका आगामी निवडणुकांमध्ये भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.