जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोगाने २ हजार ६४२ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. एका केंद्रावर ५०० ते १४०० मतदारांना मतदान करता येणार आहे. एका केंद्रावर एक अधिकारी, दोन सहाय्यक अधिकारी, एक शिपाई अशी मनुष्यबळाची उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. सुमारे १७ हजार कर्मचारी यात गुंतवून जाणार आहेत.
एका बाजूला निवडणुकीची प्रक्रिया करताना निवडणूक विभागाने दुसर्या बाजूला मतदानाची केंद्रे १५ तालुक्यांमध्ये सज्ज करण्यास सुरुवात केलेली आहे. जर एका केंद्रांवर ५०० पेक्षा अधिक मतदारांचे मतदान होणार असेल अशा केंद्रांवर पाच कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सर्वाधिक ३४१ मतदान केंद्रे निफाड तालुक्यात आहेत. तर पेठ तालुक्यात ८३ मतदान केंद्रांवर मतदान होईल. निवडणूक कामासाठी निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, मनपा आणि शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी नमूद केलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुमारे १३ हजार शिक्षक आहेत.
त्याखालोखाल आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांची संख्या आहे. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांपेक्षा शिक्षण विभागाचे कर्मचारी जास्त प्रमाणात निवडणूक कामासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्याचबरोबर खासगी शाळांच्या शिक्षकांनाही निवडणूक कामासाठी मदतीला घेतले जाणार आहे.