शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत असंही भूषण देसाईंनी यावेळी म्हटलं. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात असतानाच सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.ठाकरे गटाच्या वतीने पत्रक काढून सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे सुभाष देसाईंनी?
“माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.” – सुभाष देसाई, नेते, शिवसेना
Edited by : Ratnadeep Ranshoor