मुंबई, : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २६ वी आणि महिलांची २१ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. २४ ते २७ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होत असून इच्छुकांनी २० जानेवारी पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून कामगार कबड्डी स्पर्धा होऊ शकली नव्हती. आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदित असलेल्या आस्थापनांच्या संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे. दरवर्षी राज्यभरातून १०० पेक्षा अधिक कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होतात. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला अशा तीन गटांत साखळी सामने खेळवण्यात येतील.
पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला तीनही गटातील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी रु. ५० हजार, उपविजेत्या संघांना रु.३५ हजार आणि तीनही गटातील प्रत्येकी २ उपांत्य उपविजेत्या संघांना २० हजार तसेच सांघिक चषक, खेळाडूंना वैयक्तिक पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण (पकड) आणि प्रत्येक दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आदी वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना दिली जातील.
मुंबई व ठाणे व्यतिरिक्त बाहेरुन येणाऱ्या सर्व संघांना प्रती दिन रु.४०००/- प्रवास व निवास भत्ता दिला जाणार आहे. मुंबई व ठाण्यातील महिला संघांना प्रती दिन रु.१०००/- भत्ता दिला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या महाकल्याण या यू-ट्यूब चॅनलवर तसेच
sportvot.com या क्रीडा संकेतस्थळावर केले जाईल. तरी इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी
https://public.mlwb.in/public या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास भेट द्यावी, असे आवाहनही श्री. इळवे यांनी केले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor