कोल्हापूर- खोची (ता. हातकणंगले ) येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रदीप उर्फ बंडा पोवार (वय ३०) असे नराधमाचे नाव आहे. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ही घटना घडली होती. मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील ऍड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. सदर बालिकेचे प्रथम अपहरण, बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. न्यायालयाने पोवरला या पूर्वीच दोषी ठरवले होते. न्यायालयाच्या आवारात खोची ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
काय आहे प्रकरण ?
याबाबत अधिक माहिती अशी की, खोची (ता. हातकणंगले) येथील एका शेतकरी कुटूंबातील ६ वर्षाची चिमुरडी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिची आई शेतातून काम करुन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. याची माहिती गावातील नागरीकांना समजली, ग्रामस्थांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी सदरची बालिका गावातीलच बंडय़ा पोवार याच्यासोबत सकाळी ११ वाजता पाहिल्याचे चौघांनी सांगितले. यानुसार ग्रामस्थांनी बंडय़ाच्या घरी जावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणास या संदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगून तो झोपी गेला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नितीन जाधव, व वाघ या दोन तरुणांना गावातीम जामा मश्चिदीमध्ये करंजीच्या झाडाखाली संबंधीत चिमुरुडी निपचीत अवस्थेत पडल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वडगांव पोलीस तसेच चिमुरडीच्या नातेवाईकांना दिली. त्या चिमुरडीचे आई – वडील व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्या चिमुरडीच्या तोंडातून व नाकातून रक्त येत होते, तसेच तिच्या शरिरावर जखमा दिसत होत्या. घटनास्थळी तात्काळ वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष घोळवे व त्यांचे पथक दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून सावर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविला. यावेळी तेथील डॉक्टरांनी संबंधीत चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान वडगांव पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. यावेळी संबंधीत चिमुरडी सकाळी ११ वाजता गावातीलच बंडय़ा उर्फ प्रदीप पोवार याच्यासोबत फिरत असल्याचे समोर आले. यानुसार पोलिसांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता.
२८ एप्रिल २०२२ रोजी झाली अंतिम सुनावणी
सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी नराधम बंडा उर्फ प्रदीप दिलीप पोवार याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी गुरुवारी २८ एप्रिल रोजी दोषी ठरविले. विशेष सरकारी वकील अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. दरम्यान न्यायालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
कोण आहेत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील?
या खूनाच्या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली. या खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. यादव यांची निवड केली आहे. ॲड. यादव हे मूळचे कोल्हापूरचे असून, राज्य शासनाच्या वतीने महत्वाच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करीत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा सिटी लीमोझिंन घोटाळा, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे कोपर्डी खून-बलात्कार प्रकरण, जवखेडे अहमदनगर येथील तिहेरी दलित हत्याकांड, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जामखेड दुहेरी हत्याकांड, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरण, पोलीस अधिकाऱ्यानी कर्तव्यावर असताना मॉडेलवर केलेले साकिनाका बलात्कार प्रकरण, घाटकोपर येथील हिरे व्यापारी उदानी हत्याकांड, संगमनेर येथील व्यापारी गौतम हिरेन अपहरण-खून प्रकरण, रझा अकादमीच्या मोर्च्यावेळी घडलेली मुंबईतील आझाद मैदान दंगल प्रकरण या इतर महत्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे.