कोल्हापूर- सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून एका चोराने धूम ठोकली. या चोरट्याने कोल्हापुरातील मंगळवार पेठेत, पाण्याच्या खजिन्याजवळील पशूसंवर्धन कार्यालयात चोरी केली. या चिठ्ठीची चर्चा सध्या शहरभर जोरदार सुरू आहे.
पाण्याच्या खजिना परिसरात पशूसंवर्धन विभागाचे मुख्य कार्यालय आहे. रविवारी येथे एक चोर शिरला. पण शासकीय कार्यालयात त्या चोरीला काय मिळाले असेल? असा प्रश्न पडला असेल. हा प्रश्न चोरालाही पडला असावा आणि म्हणून त्याने या कार्यालयातील तीन संगणक, झेरॉक्स मशीन असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला.
आता केवळ हा चोर चोरी करून थांबला नाही, तर त्याने या कार्यालयातील एका टेबलावर सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. सोमवारी कर्मचारी कार्यालयास आल्यानंतर हा प्रकार उडघकीस आला.
ही चोरी एखाद्या गरजू विद्यार्थ्याने केली आहे का? असा संशय पोलिसांना आहे.
मजेदार बाब म्हणजे या चिठ्ठीत माफी तर मागितली आहे, मात्र त्याखाली पुढील 5 वर्षांनी परत करेन, असेही लिहिले आहे. त्यामुळे पोलिसही अवाक झाले आहेत. सध्या पोलिस चोराचा शोध घेत आहेत. मात्र, या चिठ्ठीची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे.