लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आपापल्या घरी परतलेले परप्रांतीय मजूर, कामगार राज्यात पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या इतर भागात दररोज जवळपास १६ ते १७ हजार मजूर परतत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मजुरांची योग्य नोंद व थर्मल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
“करोनाशी लढताना महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केलं होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय करोनाच्या संकटामुळे बंद झाले होते. पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योग व्यवसाय हळूहळू चालू झाले आहेत. हे चालू होत असल्याने महाराष्ट्रातील परप्रांतीय श्रमिक जे आपापल्या राज्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात परत गेले होते त्यांची महाराष्ट्रात घऱवापसी सुरु झाली आहे. मोठ्या संख्येने ते येत आहेत.